मला माफ करा; पिंपरीत तलाठी पतीनं डॉक्टर पत्नीला केले ठार

मला माफ करा; पिंपरीत तलाठी पतीनं डॉक्टर पत्नीला केले ठार

पिंपरी

पुण्याजवळ असणाऱ्या पिंपरी परिसरात एका तलाठी पतीनं आपल्या डॉक्टर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्या पत्नीवर आधी चाकूनं हल्ला करून त्यानंतर हातोडीनं डोक्यात जबरी वार करत हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर घटनास्थळी चिठ्ठी लिहून तलाठी पती फरार झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी आढळली आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

सरला विजयकुमार साळवे असं खून झालेल्या 32 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर विजयकुमार साळवे असं 35 वर्षीय आरोपीच नाव आहे. मृत सरला या पुण्यातील नायडू रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. तर आरोपी पती विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगाव याठिकाणी तलाठी म्हणून कार्यरत आहे. मृत सरला आणि विजय यांचा 2019 मध्ये प्रेम विवाह झाला होता. पण कालांतरागनं दोघांत खटकू लागलं यातूनचं आरोपी विजयनं सरला यांची निर्घृण हत्या केली आहे.

मयत सरला आणि तिचा आरोपी पती विजयकुमार यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी याठिकाणी एक फ्लॅट विकत घेतला होता. शनिवारी 4 सप्टेंबर रोजी या नवीन फ्लॅटची वास्तूशांती करण्यात आली होती. पूजा झाल्यानंतर सरला आणि विजयकुमार हे दोघंही तिथेच मुक्कामी थांबले होते. याठिकाणी विजयकुमारनं आपल्या पत्नीवर चाकूने वार केले. त्यानंतर डोक्यात हातोडी मारून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपी पतीनं घटनास्थळी चिठ्ठी लिहून घटनास्थळावरून फरार झाला आहे.

यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील आढळून आली आहे. ‘ती मला साथ देत नव्हती. त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला माफ करा’, अशा आशयचा मजकूर लिहिला होता. आरोपी विजयकुमार याला डॉ. सरला यांच्यावर चारित्र्याचा संशय होता. यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *