पुणे
बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दूध न दिल्याने संतापलेल्या मालकाने गायीला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गायीचा जागीच मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातल्या घाणेगाव परिसरात बुधवारी ही घटना घडली. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी पीपल फॉर ॲनिमल या संघटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील रमेश अहिर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हा शेती करतो. त्याच्याकडे एक संकरीत जातीची गाय होती.
बुधवारी सुनील हा गायीचे दूध काढण्यासाठी शेतात गेला असता, गायीने त्याला दूध काढू दिले नाही. यावर सुनीलला राग अनावर झाला. त्याने काठीने गायीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गायीचा मृत्यू झाला. हत्येनंतर त्याने गायीचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला.
दरम्यान, या घटनेची माहिती खामगाव येथील पीपल फॉर ॲनिमल या संघटनेच्या अध्यक्षा सुनिता आयलानी यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याचा हा क्रूर प्रकार सर्वांसमोर आणला. घटनास्थळावरून तक्रारकर्त्या महिलेने केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याप्रकरणी सुनिता आयलानी यांनी पिंपळगावराजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनील रमेश अहिर याच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम त्याचबरोबर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल केले आहेत. दूध न दिल्याने मालकाने गायीची हत्या केल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.