शिवतारेंवर निलंबनाची कारवाई करा,त्यांची पक्षातून हकालपट्टी करा…अन्यथा आम्ही महायुतीतून बाहेर पडू;राष्ट्रवादीकडुन निर्वाणीचा इशारा

शिवतारेंवर निलंबनाची कारवाई करा,त्यांची पक्षातून हकालपट्टी करा…अन्यथा आम्ही महायुतीतून बाहेर पडू;राष्ट्रवादीकडुन निर्वाणीचा इशारा

पुणे

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर बारामतीत वर्चस्व कोणाचं असा प्रश्न निर्माण झाला. त्या प्रश्नाचं उत्तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळेल. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.

नणंद विरुद्ध भावजय अशा संघर्षाला काका विरुद्ध पुतण्या असाही पदर आहे. पण या संघर्षात शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी अजित पवारांचं टेन्शन वाढवलं आहे.१२ एप्रिलला दुपारी १२ वाजता बारामती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि पवारांचे बारा वाजवणार, असा निर्धार शिवसेनेचे नेते शिवतारेंनी केला आहे.

यावरुन राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवतारेंवर निलंबनाची कारवाई करा. त्यांची पक्षातून हकालपट्टी करा. अन्यथा आम्ही महायुतीतून बाहेर पडू असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.विजय शिवतारे गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही सातत्यानं करत आहोत.

त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे आता त्यांची हकालपट्टी करण्यात यावी. तरच आमचं ,माधान होईल. अन्यथा आम्ही महायुतीतून बाहेर पडण्याचा विचार करू, असं म्हणत उमेश पाटील यांनी थेट इशारा दिला.शिवतारेंवर कारवाई करण्याची मागणी आम्ही एकनाथ शिंदेंकडे अनेकदा केली.

पण शिवसेनेनं त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे महायुतीत राहायचं की नाही याचा विचार आम्ही गांभीर्यानं करत आहोत. गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या आहेत. हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे. आमच्या नेत्यांवर अशा शब्दांमध्ये होणारी टीका सहन केली जाणार नाही.

यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये केवळ कटुता निर्माण होईल. याचा परिणाम महायुतीच्या कामगिरीवर होईल. हे सगळं थांबायला हवं. शिंदेंनी शिवतारेंची हकालपट्टी करायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *