पुणे
सोमवारपासून, राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी आज, विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ज्यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेत्यांविरोधात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली.काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते, आदित्य ठाकरे यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, या गोष्टीचे सरकारला गांभीर्य नाही का,” असा सवाल पवार यांनी केला.
कामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये आले. एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा अर्क टाकते का?” असा खोचक सवाल पवार यांनी केला.