पुणे
पतीसोबत दुचाकीवरून घराकडे जात असताना ट्रकचा धक्का लागून खाली पडलेल्या २६ वर्षीय राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघाताची ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
पंढरपूर-पुणे महामार्गावर भंडीशेगांव जवळ कोळ्याचा मळ येथे हा अपघात झाला. योगीता स्वप्नील शिंदे असे मृत तरुणीचे नाव आहे. योगीता ही राष्ट्रवादी युवती पंढरपूर शहर उपाध्यक्ष होती.
याचबरोबर योगीता ही कोटी येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एम-टेक’चे शिक्षण घेत होती. योगीताच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
योगीताचे पती बँकेत नोकरी करतात. योगीताचे पती हे तिला आणण्यासाठी रविवारी कोर्टी येथे आले होते. तेथून दोघे पती-पत्नी दुचाकीवरून लवंगकडे निघाले.
त्यावेळी ओव्हरटेक करताना योगीताला ट्रकचा धक्का बसला. त्यानंतर ती चाकाखाली पडली. यामध्ये ट्रकचे पाठीमागील चाक डोके आणि अंगावरून गेले. यात योगीताचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. योगिताला रुग्णवाहिकेत उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी योगिताचा पती स्वप्नील शिंदे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.