लातूर
मुलींची छेड काढत एका मुलीच्या चेहऱ्यावर फायटरने मारहाण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराची लातूर पोलिसांनी रस्त्यावरून चांगलीच धिंड काढली आहे. साधी धिंड नाही तर महिला पोलिसांनी खाकीचा प्रसाद देत या आरोपीला ठाण्यात आणले.
गौस सय्यद असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यापर्यंत गुन्हेगाराची वरात काढली.
लातूरच्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेसमोर गौस सय्यद नावाच्या सराईत गुन्हेगाराने एका मुलीची छेड काढली. छेड काढणाऱ्याला त्या मुलीने विरोध केला.
मुलगी आक्रमक झाल्याचं पाहून या आरोपीने मुलीच्या चेहऱ्यावर त्याच्याकडे असलेल्या फायटरने मारहाण केली. या घटनेची माहिती विवेकानंद चौक पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेत पॉलिसी खाक्या दाखवला. एवढेच नाही तर त्याची पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढली. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक रहावा हा यामागचा पोलिसांचा हेतू आहे.