“मी कुठे कमी पडले” राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मा.जिल्हाध्यक्षांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केली नाराजी

“मी कुठे कमी पडले” राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मा.जिल्हाध्यक्षांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केली नाराजी

दौंड

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे यांनी समाज माध्यमांवर ‘मी कुठे कमी पडले’ अशी पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमुळे नागवडे यांना डावलले, अशी चर्चा दौंड तालुक्यात सुरू आहे.

नागवडे या गेली २१ वर्षे राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ आहेत. पवार कुटुंबीयांतील प्रत्येक नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत.

या सबंधांमुळेच राष्ट्रवादीने त्यांना पंचायत समितीचे सदस्य, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद, महानंदाचे अध्यक्षपद, पंचायतराज कमिटीचे अध्यक्षपद, प्रदेश सरचिटणीस अशी पदे बहाल केली आहेत.

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नागवडे यांचा 350 मतांनी पराभव झाला होता. हा पराभव पक्षांतर्गत गटबाजीमुळे झाला, असे त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांचे मत आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही नागवडे या तीव्र इच्छुक होत्या. मात्र त्यावेळीही त्यांना डावलण्यात आले होते.

आता पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतही पक्षाने नागवडे यांना महिला वर्गातून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितला होता. नागवडे यांचे समर्थक या वेळी प्रचंड आशावादी होते. परंतु जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही नागवडे यांना डावलले गेल्याने समर्थक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

नागवडे यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. रास्ता रोको आंदोलनात सर्वात आधी रस्त्यावर बसणाऱ्या त्या महिला कार्यकर्त्या आहेत.

कोरोना काळात दौंडमध्ये त्या राष्ट्रवादीतील सर्वाधिक मदत करणाऱ्या पदाधिकारी म्हणून त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. महिला बचत गट, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

बारामती आणि हवेली तालुक्यात 3-3 इच्छुकांना उमेदवारी मिळाली आहे. दौंड तालुका हा जिल्हा बँकेला सर्वाधिक नफा देणारा तालुका असूनही गेली अनेक वर्ष तालुक्याची एकाच संचालकावर बोळवण केली जात आहे.

त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. पण ते उघडपणे बोलू शकत नाहीत. उमेदवारीसाठी तालुक्याचा पाठिंबा कमी पडला की इतर काही कारणे आहेत, यावर सध्या चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *