मनोहर मामा भोसलें विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मनोहर मामा भोसलें विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

सोलापूर

अलीकडेच तथाकथित महाराज मनोहर मामा भोसले यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशात आता मनोहर मामा भोसले यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन करमाळा पोलिसांचे स्वतंत्र पथक मनोहर भोसलेच्या अटकेसाठी रवाना झाले आहे. दरम्यान या प्रकरणी कलम ३७६ २n,‌ ३७६d, ३५४ ३८५ आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला.

उंदरगाव येथे संत बाळूमामांचा अवतार असल्याचं भासवणाऱ्या मनोहर मामा भोसले यांचा बाळूमामा यांच्या नावाने महत्व मंदिर आहे. या मठांमध्ये अनेक भाविक येतात या भाविकांकडून बाळूमामांच्या नावाने आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला होता. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोहर मामा यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता आलेल्या बातमीनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली. याबाबत शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) या २३ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.२० ऑगस्ट २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२१ या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो, असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख ५१ हजार रुपये घेत फसवणूक केली. तसेच पैसे परत मागितले असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही या  फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान या प्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. मनोहर भोसले विरोधात आलेल्या गंभीर तक्रारींची पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी दखल घेतली आहे. फसवणूक प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अटक करण्याची तयारी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *