बारामतीत राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडणार तर वरळीत अरबी समुद्राच्या पाण्यानं मशाल विझवणार

बारामतीत राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडणार तर वरळीत अरबी समुद्राच्या पाण्यानं मशाल विझवणार

मुंबई

बारामतीत राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडणार, नागपूरच्या साकोलीत काँग्रेसच्या पंज्य़ाला थांबवणार आणि वरळीत अरबी समुद्राच्या पाण्यानं मशाल विझवणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा पणच केलाय. यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. भाजपचं पहिलं टार्गेट आहे बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ.

भाजपचं दुसरं टार्गेट आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा साकोली मतदारसंघ आणि तिसरं टार्गेट आहे आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ.2024 च्या लोकसभेसाठी भाजपनं बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीय केलंय. यासाठी केंद्रीय मंत्र्यांवर बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे.

2019 च्या लोकसभेला बारामतीत सुप्रिया सुळेंना 6 लाख 86 हजार 714 मतं मिळाली होती. तर, भाजपच्या कांचन कुल यांना 5 लाख 30 हजार 940 मतं मिळाली होती. 1 लाख 55 हजार 774 मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या.
2019 च्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवारांना 1 लाख 95 हजार 641 मतं मिळाली.

तर त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपच्या गोपीचंद पडळकरांना 30 हजार 376 मतं मिळाली होती.अजित पवारांचा 1 लाख 65 हजार 265 मतांनी विजय झाला होता. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत साकोलीत नाना पटोलेंना 95 हजार 208 मतं मिळाली. तर, भाजपच्या परिणय फुकेंना 88 हजार 968 मतं मिळाली होती.

नाना पटोलेंचा अवघ्या 6 हजार 240 मतांनी विजय झाला होता.2019 साली वरळी मतदारसंघात शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली. पण, त्याला भाजपचाही पाठिंबा होता. आदित्य ठाकरेंना 89 हजार 248 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश मानेंना 21 हजार 821 मतं मिळाली. आदित्य ठाकरेंचा 67 हजार 427 मतांनी विजय झाला होता.यामुळं या 4 नेत्यांच्या विरोधात भाजप आत्तापासूनच तयारीला लागलीय.

बावनकुळेंनी केलेल्या या निर्धाराला महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले.काँग्रेस काय आणि राष्ट्रवादी काय महाआघाडी आहे. देशात काँग्रेसचा प्रचार सुरुच आहे..म्हणजे बाकीच्यांना बुडवणार आणि तुम्हीच राहणार असे तुमचे मनसुबे आहेत का? बाकी ठिकाणी तुम्हाला शरद पवार चालतात. मग ते क्रिकेट आहे. खेळ आहे..किती ढोंगं कराल? असा सवाल शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *