मुंबई
मोहित कंबोज यांनी काही दिवसांआधी राष्ट्रवादीला इशारा दिला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता अडचणीत येणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. “बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा मी सखोल अभ्यास करतोय. त्या संदर्भातील अधिकचे अपडेट लवकरच देईल”, असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे. त्यामुळे कंबोज यांनी काही दिवसांआधी इशारा केलेला ‘राष्ट्रवादीचा बडा नेता’ रोहित पवार आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय.
मोहित कंबोज यांनी ट्विटरच्या माध्यमातूव राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.
“हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असंही ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची आजच चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा पुढचा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला होता. त्यांनी आज एक ट्विट करत रोहित पवार तो पुढचा नेता असू शकतो, असा इशारा दिलाय.
अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांच्या नंतरची जागा रिकामी करत ही गाळलेली जागा लवकरच भरली जाईल, असं सांगितलं आहे. शिवाय आपना स्ट्राईक रेट 100 है!, असंही ट्विट कंबोज यांनी केलं होतं. आज त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.