पुणे
काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी पवारांशी चर्चेनंतरच झाला होता असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर त्यावर सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी असत्याचा आधार घेतला असे म्हटले होते.
त्यानंतर आता पुन्हा पवारांनी यासंदर्भात आणखी एक मोठे विधान केले आहे.पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे.
‘अजित पवारांनी यावर बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.शरद पवार आज चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना पहाटेच्या शपथविधीबाबत अप्रत्यक्षरित्या एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
या विषयावर अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा अप्रत्यक्षरित्या टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘बरं झालं आता त्यांनी स्वत:च याबद्दल खुलासा केला’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच ‘आता एवढं बोलले तर राष्ट्रपती राजवट का लागली? त्यामागे कोण होते? कोणाच्या सांगण्यावरून लागली आणि त्याच नेमकं कारण काय? अश्या सगळ्या गोष्टींचाही ते खुलासा करतील ही माझी अपेक्षा आहे, अशी गुगली देखील फडणवीस यांनी टाकली आहे. या सगळ्या कड्या जोडल्या तर सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट होतील, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.