पुरंदरवर होणार शासकीय संभाजी महाराज जयंती

पुरंदरवर होणार शासकीय संभाजी महाराज जयंती

नियोजन समितीत शिवतारेंच्या मागणीला पालकमंत्र्यांचा दुजोरा

     शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या धर्तीवर पुरंदर किल्ल्यावर देखील संभाजी महाराजांची शासकीय जयंती साजरी करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत मागणी केली होती. या मागणीवर उत्तर देताना पालकमंत्र्यांनी यावर्षी पासूनच शासकीय इतमामात जयंती साजरी करूयात असं  प्रतिपादन केलं आहे. 

  जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन येथे पार पडली. यावेळी बैठकीला जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हा नियोजन समिती सदस्यांसह अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बैठकीत श्री. शिवतारे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची पुरंदर किल्ल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दरवर्षी १४ मे रोजी साजरी करावी अशी मागणी केली. शासकीय महापूजा, पोलीस दलाकडून मानवंदना आणि अभिवादन असे कार्यक्रम यावेळी व्हावेत अशी मागणी शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही केली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मागणीला तत्काळ संमती देत या वर्षीपासूनच शासकीय इतमामात हा सोहळा संपन्न करूयात असे सांगितले. पुरंदर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी देखील संभाजी महाराज जयंती बाबत ठराव केले होते. शंभूप्रेमींनी याबाबत मोठी मोहीम सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर आज शिवतारे यांनी शंभू महाराजांच्या जयंतीबाबत जिल्हा नियोजन समितीत मुद्दा उपस्थित करून तो मार्गी लावून घेतला.

शंभूप्रेमींच्या वतीने आभार – प्रशांत पाटणे

   संभाजी महाराज जयंती शासन स्तरावर साजरी व्हावी यासाठी प्रयत्न करीत असलेले पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे याबाबत म्हणाले, शंभूप्रेमी जनता गेल्या काही वर्षांपासून यासाठी आग्रही होती. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी हा प्रश्न मार्गी लावला. आम्ही तमाम शंभूप्रेमी या निर्णयाचे स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *