पुरंदर
चिकनगुनिया चे बेलसर बनले हॉटस्पॉट
निखिल जगताप प्रतिनिधी बेलसर
सध्या वातावरण बदलामुळेआणि पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पिण्याचे पाणी व वापराचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी बेलसर शिवरी माळशिरस राजुरी भागात डेंग्यु, मलेरिया चिकनगुनिया त्यासोबतच इतर साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये चिकनगुनिया चा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुरंदर तालुक्यातील बेलसर मध्ये डेंग्यू चिकनगुनिया च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बेलसर मधील आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार पन्नास घरांमध्ये डेंग्यू च्या लारवा म्हणजेच आळ्या आढळल्या होत्या. घरामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये, प्रामुख्याने उघड्या असलेल्या पाण्यामध्ये, निरूपयोगी वस्तू , फ्रिज मधील भांड्यांमध्ये त्याचबरोबर इतरत्र परिसरामध्ये आजाराच्या अळ्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्याकडून करण्यात आले आहे.
डेंग्यू ताप या रोगाचा प्रसार डासांपासून होतो. या रोगास विषाणू कारणीभूत असून त्यांचा प्रसार एडीस एजिप्ती डासांची मादी करते, एडीज डास दिवसा व रात्री केव्हाही चावतात हे डास घरातील साठा करून ठेवलेल्या पाण्यात आढळतात. डेंगू तापा चा आजार हा महत्त्वाचा संसर्गजन्य आजार असून विषाणू दूषित रोगी व डास हे त्रिकूट डेंग्यू तापाची साथ पसरवण्यास मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरतात. डेंगू तापा चा आजार बऱ्याच वेळा मोठ्या साथीच्या स्वरुपात उद्भवतो या तापात होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे मृत्यू ही येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
आरोग्य विभागाकडून विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे. बेलसर गावातील ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून दररोज बेलसर गावातील गावठाण मध्ये सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये उघडी भांडी त्याचबरोबर साचलेले स्वच्छ पाणी याची पाहणी करून डेंगू रोगाच्या आळ्या किंवा लार्वा असतील तर त्या नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत संबंधित घर मालकाला नोटीस देऊन.पाणी झाकण बंद करावे व अतिरिक्त पाणीसाठा करू नये अशी विनंती करण्यात येत आहे.
नियम पाळणार नाही त्यावर कायदेशीर व दंडात्मक दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर अशा जनजागृती साठी अनाउन्समेंट चा वापर केला जात आहे. त्याचबरोबर गावांमध्ये तणनाशक फवारणी व धूराळणी करून गावचा परिसर स्वच्छ केला जात आहे. परंतु गावातील ग्रामस्थांनी जबाबदारीने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
डेंग्यू तापाची लक्षणे:
1)अचानक उदभवणारा तीव्र ताप
2)तीव्र डोकेदुखी व अंगदुखी
3)डोळ्यांच्या हालचालीस त्रास होणे
4)स्नायु व सांधेदुखी
5)तोंडाची चव जाणे
6)मळमळ व वांत्या होणे
7)छातीवर, हातांवर तांबडे पुरळ येणे
डेंग्यू ताप प्रतिबंधक उपाय
-घरातील पाणी साठवणारी भांडी सात दिवसांनी रिकामी करावी व दोन कोरडी करावी.
- दैनिक कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे करणे
- डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे
- डेंगू उद्रेकाचे वेळी घरोघरी धुरळणी करावी
- घरातील फ्रीज, कूलर, मनीप्लांट मधील पाणी चार दिवसांनी बदलावे.
- घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एक दिवस कोरडे ठेवावेत
- घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.
पुरंदर तालुक्यामध्ये सध्या डेंग्यू, चिकनगुनिया आणि साथीचा रोग पसरत आहे.आरोग्य विभागामार्फत तालुक्यामध्ये सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये गावातील गावठाणा सोबतच वाडी-वस्तीवर सर्वेक्षण केले जात आहे. शहरी भागातही सर्वेक्षण करून जनजागृतीच्या माध्यमातून या रोगाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. रोगाची काही लक्षणे आढळल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत. डेंग्यू तापाच्या साथीची व वाढीची कारणे त्याच बरोबर डेंग्यू ताप प्रतिबंधक उपाय याचे नागरिकांना परिपत्रकाद्वारे व वेगवेगळ्या माध्यमाद्वारे माहिती दिली जात आहे. आरोग्य विभाग साथ रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-उज्वला जाधव (तालुका वैद्यकीय अधिकारी)
मागील काही दिवसांमध्ये बेलसर गावातील डेंग्यू चिकनगुनिया च्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. परंतु ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व आरोग्य विभागामार्फत गावांमध्ये तननाशक फवारणी व धुरळणी करून, त्याच बरोबर गावातील पाणी साठे यांचे सर्वेक्षण करून सद्यस्थितीला डेंग्यू आणि चिकनगुनिया च्या उत्पत्तीला आळा घालण्यात आला आहे. परंतु गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. जोपर्यंत गावातील ग्रामस्थ नागरिक स्वतः काळजी घेणार नाहीत तोपर्यंत रोग आटोक्यात येणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम गावातील ग्रामस्थांनी स्वच्छ ठेवावा व पाणीसाठे उघडे ठेवू नयेत.
-धीरज जगताप( उपसरपंच बेलसर)
बेलसर(ता.पुरंदर) येथे किटकजन्य आजाराबाबत माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी