पुणे
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. बापट यांच्या अकाली निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे लवकरच या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागल्यास उमेदवारी कोणाला मिळणार? याकडे आता सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. या जागेसाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीत यासाठी स्पर्धा लागली आहे.
यात एका आता नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे. ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून आता राष्ट्रवादी देखील इच्छुक असल्याचं दिसत आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचे भावी खासदार असा उल्लेख असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे. या बॅनरवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
पुण्यातील वडगाव परिसरात हे बॅनर झळकले. याआधीही प्रशांत जगताप यांचे भावी खासदाराचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, मात्र आता प्रत्यक्षात बॅनर लावण्यात आले आहेत. प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शहरात अनेक ठिकाणी भावी खासदार म्हणून बॅनर्स लावले आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात अद्याप पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. त्यातच या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच प्रशांत जगताप यांना भावी खासदार केले गेले आहे. त्याची चर्चा या बॅनरमुळे होताना दिसते आहे.