पुणे
राज्यभरात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा होत असतानाच, पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात रक्षबंधनाच्या दिवशीच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने हमालाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे हा सर्व प्रकार बुधवारी सांयकाळी ५ वाजता उरुळी कांचन भागात असणाऱ्या शिंदवने रस्त्यावर घडला.
भारती होले असं मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्या उरुळी कांचन पोलीस चौकीत कार्यरत आहेत. तर किशोर निवृत्ती गरड असे मारहाण झालेल्या हमालाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शिंदवने रस्त्यावर एका किराणा दुकानात किराणा माल उतरवत असताना, अचानक तिथे भारती होले आल्या आणि त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. असा आरोप किशोर गरड यांनी केला आहे.
तर दुसरीकडे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती होले या ड्युटीवर असताना गरड यांनी नियम मोडला. त्यावेळी होले यांनी गरडवर कारवाई केली. मात्र त्यावेळी हमाल गरड याने कारवाईला सहकार्य केले नाही. त्यामुळे बाचाबाची झाली आणि नंतर कायदा दाखवला लागला. असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघून आता पोलिसांनाच कायद्याचा धाक राहिला नाही का? अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर काही जणांनी या महिला पोलिसावर कारवाई करावी असंही म्हटलं आहे. याबाबतचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.