पुणे
सख्ख्या भावांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. दोन भावांच्यामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात झाले, यात चंद्रकांत चासकर यांना त्यांचा सख्खा भाऊ सुभाष चासकर याने बेदम मारहाण केली, या मारहाणीमध्ये चंद्रकांत चासकर यांचा जागीत मृत्यू झाला.सुभाष चासकर हे अग्निशमन दलात रिटायर्ड कर्मचारी होता.
चंद्रकांत चासकर आणि सुभाष चासकर या दोन सख्ख्या भावांमध्ये घरासमोरच ही हाणामारी झाली, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. याप्रकरणी चंद्रकांत चासकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
चंद्रकांत चासकर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलीस तपासाला पुढची दिशा मिळेल. पण क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आंबेगावमधील महाळुंगे पडवळ गावातील या दोन भावांमध्ये भांडण असून त्याच्या जमिनीची वाटणी बाकी आहे, ही वाटणी अजून झालेली नाही.
यातच चंद्रकांत चासकर यांच्या सुनेने शेवग्याच्या झाडाच्या शेंगा तोडल्या, त्यानंतर दोन्ही भावांमध्ये वाद झाला. यात सुभाष चासकर याने चंद्रकांत चासकर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली, यामध्ये चंद्रकांत चासकर खाली पडले आणि मरण पावले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक केली आहे.