पुणे जिल्ह्यात “या” ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना ; प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसांच्या बाळाला दरीत फेकले

पुणे जिल्ह्यात “या” ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना ; प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसांच्या बाळाला दरीत फेकले

पुणे

माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटा च्या दरीत फेकून दिल्याची क्रूर घटना घडली आहे.

याप्रकरणी चार जणांविरोधात पौड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण, सचिन गंगाराम चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांनी ४ फेब्रुवारी रोजी बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकले होते. ट्रेकर्सच्या मदतीने बाळाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

फिर्यादी महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. ती अकरा वर्षाच्या आपल्या मुलीसोबत गोडांबेवाडी येथे राहत होती. या दरम्यान नात्यातीलच सचिन चव्हाण याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले.

याच काळात महिला गर्भवतीही राहिली. मात्र, सचिन याचे महिलेसोबत राहणे त्याचे भाऊ संजय, नितीन, अजय यांना आवडत नव्हते. दरम्यान, 30 जानेवारीला महिलेची प्रसुती होऊन तिने मुलाला जन्म दिला.

त्यानंतर संजय, नितीन, अजय आणि सचिन यांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास आपण गावी राहू, असे सांगून संबंधित महिला, तिची मुलगी आणि सहा दिवसांच्या बाळाला आपल्या सोबत नेले. त्यानंतर ताम्हिणी घाटात दरीपुलाजवळ पहाटे पावणे चारच्या सुमारास गाडी थांबवून चौघा भावांनी महिला आणि तिच्या मुलीला गाडीत बसविले.

नंतर सहा दिवसाच्या बाळाला ओढून घेतले व गाडीचे सर्व दरवाजे लॉक करून बाळाला दरीत फेकून दिले. याप्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने पौड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *