पुणे
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचा व पंचायत समित्यांचा समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये ८२ सदस्य व १३ तालुके मिळून १६४ पंचायत समिती सदस्य असणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेला गट व पंचायत समित्यांसाठी गण असतो. या गण-गट रचनेचे प्रारुप दि.३१ मे २०२२ रोजी प्रसिद्ध केले जाणार असून त्यावर नागरिकांना दि. २८ जून २०२२ पर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. तर अंतिम प्रभागरचना २७ जून २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत मार्च 2022 मध्ये समाप्त झाली असून सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याने निवडणुकांच्या कामाला वेग आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून नंतर सादर केला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.