निवडणुकीसाठी बायको पाहिजे असे म्हणत बँनरबाजी करुन हवा करणार्या पठ्ठ्यावर गुन्हा दाखल !!!!!!

निवडणुकीसाठी बायको पाहिजे असे म्हणत बँनरबाजी करुन हवा करणार्या पठ्ठ्यावर गुन्हा दाखल !!!!!!

औरंगाबाद

निवडणुकीसाठी बायको पाहिजे,अशी बॅनरबाजी करून शहरात एकच हवा करणाऱ्या पठ्ठ्याला हा प्रकार चांगलाच महागात पडला. स्वतःला तिसरं अपत्य झाल्यानं निवडणूक लढवता येणार नाही, त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे, असा मोठा बॅनर यानं शहरात झळकवला अन् पाहता पाहता हा राज्यात चर्चेचा विषय बनला. बातम्यांमध्ये झळकला, चॅनल्सवर आला.

पण महिलांबद्दल अशा प्रकारे मजकूर लिहिल्याबद्दल हे प्रकरण त्याला चांगलंच भोवलं. या महाशयांविरोधात आता औरंगाबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादेतील तरुण रमेश विनायक पाटील असं यांचं नाव आहे. लॉकडाऊननमध्ये त्यांना तिसरे अपत्य झाले. तीन अपत्य झाल्यामुळे महापालिका निवडणूक लढता येणार नाही, मात्र ती लढवण्याची त्यांची खूप इच्छा आहे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी थेट शहरभर बायको पाहिजे, असे लिहिलेले बॅनर लावले.

बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असावी, हेसुद्धा लिहिले. पाटील यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. मात्र ही बॅनरबाजी केल्यानंतर विविध समूहांकडून त्यांच्यावर टीका झाली.

दरम्यान, पाटील यांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पैठणगेट व गुलमंडीत हे बॅनर लावल्यानंतर संध्याकाळी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या बॅनरवर शाई फेकून या वृत्तीचा जोरदार निषेध केला.

तसेच महिला आयोगानेही या घटनेबाबत त्या पुरुषावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक लढवण्यासाठी महिलांचा असा अपमान सहन करणार नाही, असे महिलांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, सदर रमेश विनायक पाटीलविरोधात या प्रकारामुळे क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त बॅनर लावणाऱ्या पाटील यांच्याविरोधात महापालिकेच्या तक्रारीवरून अखेर रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला.

महापालिकेचे अधिकारी प्रकाश आठवले यांच्या आदेशावरून स्वच्छता निरीक्षक मोहाडे यांनी पोलीस ठाण्यात पाटील यांच्याविरोधात तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *