पुणे
नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी झारगडवाडी (ता. बारामती) येथे गालबोट लागले असून चार महिलांना भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत असून आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे.संपूर्ण जिल्ह्यात (ता. २२) रोजी घटस्थापना झाल्यानंतर नवरात्र उत्सवास उत्साहात सुरुवात झाली. या उत्सवात नऊ दिवस महिला मोठ्या प्रमाणात उपवास धरतात. अलीकडच्या काही वर्षात उपवासाच्या काळात महिला मोठ्या प्रमाणात शाबुदाना व भगरीपासून तयार केलेल्या पिठाच्या भाकरी करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारात या पिठास मोठ्या प्रमाणात मागणी असते.
ग्रामीण भागात अनेक किराणा मालाच्या दुकानात हे पीठ दळून विक्रीसाठी उपलब्ध होते. तसेच काही ठिकाणी बाहेरून आणूनही विक्री केली जाते. दरम्यान आज झारगडवाडी येथील काही महिलांना त्रास व्हायला लागला. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी नेण्यात आले. तर काहींना वैदयकीय महाविद्यालयात बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले.
मात्र एका किराणा मालाच्या दुकानातून नेलेल्या भगरीच्या पिठाच्या भाकरी करून खाल्ल्यानंतर त्रास व्हायला लागला अशी ग्रामस्थांच्यात दिवसभर चर्चा होती. त्यानंतर पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन झारगडवाडी गावात तीन पथकांच्या माध्यमातून तातडीने सर्व्हेक्षण केले.
यामध्ये ९१ कुटूंबातील ४३५ नागरिकांची तपासणी करण्यात आली.भगर पीठ खरेदी केलेल्या १५ कुटुंबापैकी ४ महिलांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी २ रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत. व २ रुग्णांवर वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान आज दुपारी येथील संशयित किराणा मालच्या दुकानावर पंचायत समिती आरोग्य विभाग व रात्री अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली यामध्ये शिल्लक भगरपीठ सील केले आहे. शिवाय विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ग्रामीण व शहरी भागात उपवासाच्या काळात शाबुदाना व भगर पिठाच्या भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जात आहेत. वास्तविक या पिठाच्या भाकरी पूर्ण क्षमतेने भाजत नसल्यामुळे त्या खाण्यास परिपूर्ण नसल्याने त्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे या पिठाच्या भाकरी खाऊच नये असे आवाहन अन्न औषध प्रशासनाचे पुणे जिल्हा सहाय्यक आयुक्त बी एम ठाकूर यांनी केले आहे.