तुला मस्ती आलीय, तुझा गेमच करतो;पुणे जिल्ह्यातील “या” गावात दिवसाढवळ्या तरुणांवर कोयत्याने वार

तुला मस्ती आलीय, तुझा गेमच करतो;पुणे जिल्ह्यातील “या” गावात दिवसाढवळ्या तरुणांवर कोयत्याने वार

पुणे

रंगपंचमीच्या दिवशी (रविवार दि. १२) रंग लावण्यावरून झालेल्या वादानंतर सहाजणांनी तिघांवर कोयता, चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सहाजणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार अशोक जाधव (वय २२, रा. हरीकृपानगर, बारामती) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आदित्य उर्फ आदेश मोहिते, यश मोहिते, साहिल लोंढे, रा. आमराई, बारामती) यासह अन्य तीन अनोळखी अशा सहा जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी फिर्यादी हा त्याचे मित्र ऋतिक कांबळे, सौरभ गायकवाड यांच्यासह रंग खेळून मिशन हायस्कूलच्या ग्राऊंडवर बसले होते. यावेळी सहाजण आले.

त्यांच्यात व फिर्यादी यांच्यात रंग लावण्यावरून वाद झाला. तो वाद आपसात मिटून ती मुले तेथून निघून गेली.त्यानंतर वसंतनगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाशेजारी फिर्यादी आला असताना ही मुले हातामध्ये कोयता आणि चॉपर घेऊन तेथे आली. त्यांना पाहून फिर्यादी मिशन हायस्कूलच्या ग्राऊंडवर पळत गेला. दोन, तीन अज्ञात तरुणांकडे दगड आणि सिमेंटचे ब्लॉक होते.

साहिल लोंढे याने फिर्यादीला गाठत “तुला खूप मस्ती आली आहे. आज तुझा गेमच करतो”, असं म्हणाला. तिघांनी कोयता आणि चॉपरने फिर्यादीच्या पाठीवर आणि उजव्या हातावर वार केले.ऋतिक कांबळे यालाही साहिल याने “तुझा मर्डरच करून टाकतो. तू उद्याचा दिवस बघणार नाही”, असं म्हणत त्याच्याकडील चॉपरने डोक्यात वार केला. सौरभ गायकवाड मध्ये आला असता त्याच्याही मांडीवर देखील आरोपींनी कोयत्याने वार केला.

अनोळखी तिघांनी दगड व सिमेंट ब्लॉकने बेदम मारहाण केली. आजूबाजूचे लोक भांडणे सोडविण्यासाठी आले असताना त्यांना धमकावत आरोपी सहाजण घटनास्थळावरून निघून गेले. त्यानंतर स्थानिकांनी उपचारासाठी या जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *