पुणे
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने हैदोस घातला आहे. एकीकडे पोलिस या गँगमधील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना, दुसरीकडे कोयता गँगची दहशत काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच, पोलिसांनी कोयता गँगमधील तीन सराईत गुंडांना पकडून त्यांची वाजत गाजत धिंड काढली.
कोयता गँगच्या गुंडांनी ज्या परिसरात दहशत माजवली त्याच परिसरातून धिंड काढून पोलिसांनी त्यांचा माज उतरवला. मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव अशी या गुंडांची नावे आहेत.पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी अटक करून धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान या गुंडांची धिंड काढली आहे. धायरीत दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या गुंडांना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत राजूरकर,सहाय्यक निरीक्षक भरत चंदनशिव,फौजदार निकेतन निंबाळकर, शिपाई अमोल कट्टे, नीलेश खांबे आदींनी पकडले होते.