“जय शाह यांच्यावर त्यांच्या आरएसएसच्या पूर्वजांचा प्रभाव असल्याचे दिसते” ; तिरंगा हातात घेण्यास नकार दिल्याने जय शहा यांच्यावर देशभरातून टीका

“जय शाह यांच्यावर त्यांच्या आरएसएसच्या पूर्वजांचा प्रभाव असल्याचे दिसते” ; तिरंगा हातात घेण्यास नकार दिल्याने जय शहा यांच्यावर देशभरातून टीका

मुंबई

आशिया कप २०२२ स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात केली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. भारताच्या विजयनांतर देशभरातील नागरिकांनी एकच जल्लोष केला. दुबईतल्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवरही भारतीय चाहत्यांनी तिरंगा फडकवत आनंद व्यक्त केला.

याचदरम्यान बीसीसीआयचे मुख्य सचिव आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शहा हे वादात सापडले आहे. देशाचा राष्ट्रीय झेंडा हातात घेण्यास नकार दिल्याने जय शाह यांच्यावर देशभरातून टीका होतेय.

काल, रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर भारतीयांनी देशभरात जल्लोष केला. हा सामना पाहण्यासाठी जय शाह हे स्वतः दुबई येथील स्टेडिअममध्ये उपस्थित होते. हार्दिक पंड्याने विजयी षटकार ठोकल्यानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. जय शहा हेदेखील उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले.

यावेळी त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी जय शहा यांच्या हातात भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा देऊ केला. मात्र, जय शहा यांनी तिरंगा हातात घेण्यास नकार देत टाळ्या वाजवनेच पसंत केले. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यानंतर जय शहा यांच्यावर देशभरातून टीका होतेय.

ट्विटरवर जय शहा यांच्याविरोधात नेटीझन्सने रान उठवलं आहे.जय शहा यांच्या या कृत्याबाबत विरोधकांनीही त्यांना धारेवर धरलं आहे. देशाच्या गृहमंत्र्यांचे सुपुत्र जर हातात तिरंगा घेण्यास नकार देत असतील कर त्यांच्यात देशभक्ती आहे की नाही असा सवाल नेटकऱ्याकडून विचारला जात आहे.

याप्रकरणी तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते वाय सतिश रेड्डी यांनी ट्विट केलं की, “जय शाह यांच्यावर त्यांच्या आरएसएसच्या पूर्वजांचा प्रभाव असल्याचे दिसते” असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात जय शहा यांनी याबाबत अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *