पुरंदर
गुळुंचे (ता.पुरंदर) येथील गावकामागर तलाठी गणेश महाजन यांनी बेकायदा पंचनामे केल्याची तक्रार गावातील काहीजणांनी तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्याकडे केली आहे.
परंतु,गुळुंचे गावच्या गावकारभाऱ्यांना चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वावडे असून नियमाप्रमाणे काम करणाऱ्या तलाठ्यांवर बेकायदा तक्रार करण्यात आली असून संबंधित तक्रारदार यांचे विरोधात सरकारी नियमात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३ अन्वये गुन्हे नोंद करण्याची मागणी अक्षय निगडे यांनी केली आहे.
“तलाठी यांचे काम नियमाप्रमाणे सुरू आहे.त्यांनी व्यवस्थित पंचनामे केलेले आहेत. प्रसंगी त्यांच्या हितासाठी व न्यायासाठी उपोषण करू.” – अक्षय निगडे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा.
गावातील मतदार यादी सदोष असल्याप्रकरणी अक्षय निगडे व नितीन निगडे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्या न्यायालयात संबंधित बीएलओ यांच्याविरोधात गुन्हे नोंद प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू होती. त्यानंतर अक्षय निगडे व नितीन निगडे यांनी गावातील दुबार व बोगस नावे असलेल्या मतदारांची नावे कमी करण्याबाबत नमुना ७ चा अर्ज भरून तहसीलदार पुरंदर यांच्याकडे दाद मागितली.
यानंतर गावकामागर तलाठी गणेश महाजन यांनी संबंधित प्रकरणाची सुनावणी घेऊन पंचनामे व्यवस्थित रित्या पूर्ण केले. मात्र, याच पंचनाम्यांच्यावर आक्षेप घेत गावातील काही जणांनी गाव कामगार तलाठी यांच्याविरोधात आक्षेप घेतला आहे.
संबंधित पंचनाम्याच्या नंतर तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी योग्य ते जाब जबाब घेऊन तसेच संबंधितांना सुनावणीची पूर्ण संधी उपलब्ध करून देऊन संबंधित बोगस व मतदार नावे बोगस मतदार असलेल्याची नावे मतदार यादीतून वगळली. यासंबंधीचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे. मात्र, या आदेशाच्या विरोधात ग्रामसभा तसेच मासिक सभांमध्ये ठराव घेऊन हा निर्णय बेकायदा असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत गुळूंचे च्या वतीने सध्या सुरू आहे.
वास्तविक एकीकडे नियमबाह्य काम करणाऱ्या ग्रामसेवकांविरोधात अनेक तक्रारी दाखल असूनही त्यांच्यावर काहीही कार्यवाही होत नाही. तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे गळे आवळले जात असल्याचा प्रकार गुळुंचे गावकरभाऱ्यांच्या वतीने सुरू असल्याचे चित्र आहे.