पुणे
महाविकास आघाडी सरकाराच्या सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीच्या धोरणाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. व्यापारी संघटना , तसेच शहरातील नागरिकनांही या निर्णयाचा विरोध केला होता . यानंतर आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव या ग्रामपंचायतीतील नागरिकांकडून विरोध होत आहे.
विविध व्यापारी संघटनांनी विरोध केल्यानंतर आता ग्रामपंचायतीतील लोकांनीही याला विरोध दर्शवला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव ग्राम पंचायतीनेही आता गावातील किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात या आला आहे.
सर्व ग्रामस्थांनी एक मतांने हा निर्णय घेण्यात आला आहे. आश्चर्यांची बाब म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे प्राबल्य असलेले नेते या जिल्ह्यातील व तालुक्यातील आहेत.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पारगाव येथे ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही. गेल्या अनेकवर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे.
त्यामुळे राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या धोरणाला ग्रामस्थांनी विरोध करत आपला निषेध नोंदवलं आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामसभेत घेण्यात आलेल्या वाईन बंदीच्या ठरावाला पारगावचे माजी सरपंच अरुण बोत्रे यांनी मांडला व त्यास सरपंच जयश्री ताकवणे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सुभाष बोत्रे, भीमा पाट्सचे संचालक तुकाराम ताकवणे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संजय ताकवणे यांनी अनुमोदन दिले.
जवळपास १६ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात अद्याप एकही दारुचे दुकान नाही. तसेच ग्रामपंचायतीनेही कोणत्याही प्रकारची परवानगी या प्रकारच्या दुकानांसाठी दिलेली नाही. कोणत्याही प्रकाराच्या निवडणुकीत मतांसाठी दारूचा वापर केलेला नाही.
राजकारणात सक्रिय असलेले या गावातील राजकीयनेतेही दारू पीत नाहीत. गावाने घेतलेल्या या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार यांनी गावाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.