हवेली
उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलच्या मालकाच्या खून प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपी महिलेला न्यायालयाने 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
काजल चंद्रकांत कोकणे असे जामीन मंजूर केलेल्या महिलेचे नाव आहे. गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे हे हॉटेलसमोर बोलत असताना अचानकपणे एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. त्यांना रूग्णालय दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान बाळासाहेब खेडेकर आणि निखिल खेडेकर यांना अटक करण्यात आली होती.
तपासामध्ये आरोपींनी निलेश मधुकर आरते याला सुपारी देऊन खून घडवून आल्याचे निष्पन्न झाले होते. हा खून हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण दहा आरोपींना अटक केली होती. त्यापैकी प्रमुख आरोपी निलेश आरते याची पत्नी काजल चंद्रकांत कोकणे हिला 27 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तिच्यावर शस्त्र लपविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलेचा या गुन्ह्याच्या टोळीशी काहीही संबंध नसून, आरोपीला खोट्या गुन्हयात अडकवण्यात आले आहे. आरोपी महिला ही आठ महिन्यांची गरोदर आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला.
तो न्यायालयाने ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपी महिलेची मुक्तता केली. ॲड. सचिन झालटे पाटील व ॲड. कल्पेश राम आढाव यांच्यामार्फत तिने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.