मुंबई
अतिशय लोकप्रिय असणारा रिऍलिटी शो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनची रविवार, 19 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी 3’ चा ग्रँड प्रीमिअर पार पडला असून सर्व स्पर्धकांनी घरात दमदार एंट्री घेतली आहे. परंतु आज बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी घरात एंट्री केल्यावरून घरातील एका सदस्यावर वारकरी सांप्रदायातून टीका केली जात आहे.
एक युवा कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते अशा शिवलीला पाटील यांनी काल बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. यावरून वारकरी सांप्रदायातील महाराज ह.भ.प. निलेश भैय्या झरकर यांनी टीका केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे कि, कीर्तनकार म्हणून बिग बाॅस च्या घरात मिरवायचा नैतीक अधिकार शिवलीला ताईंना नाही. यापुढे त्यांनी कीर्तनकार हे पद कुठेही लावू नये. त्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांनी काय करावे काय करू नये ह्याच्या बाबतीत आम्हाला काही देणेघेणे नाही.अन्यथा मी कायदेशीर लेखी तक्रार पोलिस आयुक्तांच्याकडे करणार आहे, असा थेट इशाराच झरकर यांनी दिला आहे.
शिवलीला पाटील या एक कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी भक्तिमय वातावरणातच बिग बॉसच्या घरात एंट्री केली . परंतु त्यांची हि एंट्री वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. झरकर यांनी पोलिसात तक्रार करण्याचा उल्लेख केल्याने आता बिग बॉस मराठीची टीम याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवलीला यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.