उस्मानाबाद
सध्या अनेक जण स्वत:चे रिल्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतात. प्रत्येकाला आपले फॉलोवर्स वाढावे हे त्यामागचं कारणं असतं शिवाय अशा रिल्समुळे प्रसिद्धी देखील मिळते. मात्र, या रिल्समुळे अनेक जण गोत्यात आले आहेत.कधी हातात तलवार, बंदुका घेऊन रिल्स शूट केल्यामुळे अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागते तर कधी पोलिसांनी त्यांच्या वर्दीवर असताना केलेल्या एखाद्या रिलमुळे नोकरीवर पाणी सोडावे लागते.
असंच एका खाकी वर्दीतील महिलेला ड्युटीवर असताना रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणं महागात पडलं आहे.मात्र,ही खाकी वर्दीतील महिला पोलिस नसून एसटी कंडक्टर आहे. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. एसटी महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरला निलंबित केलं असून मंगल सागर गिरी असं निलंबित केलेल्या महिला कंडक्टरचं नाव आहे.मंगल गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत असून त्यांनी वर्दीवर रिल बनवल्यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.
तर वाहतूक कंट्रोलरला देखील याच कारणाने निलंबित केलं आहे. कल्याण कुंभार असं वाहतूक कंट्रोलरचं नाव आहे.गिरी यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून त्या वेगवेगळ्या गाण्यावर Video बनवून सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत.
मात्र, त्यांनी नुकतेच एसटी महामंडळाच्या वर्दीत तुळजाभवानी देवीच्या एका गाण्यावर व्हिडीओ करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला.तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला. मात्र, महामंडळाच्या वर्दीत स्वतःचे व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता याच कारणामुळे आता त्यांना निलंबणाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.