पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी इंदापूरमध्ये असणार आहे. येथे अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत. जनसन्मान यात्रेत महिलांची संख्या सर्वाधिक पाहिजे यासाठी आयोजित बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे असं काही बोलून गेले की त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये या प्रमाणे तीन हजार रुपये आतापर्यंत एक कोटी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रा येणार तेव्हा महिलांची संख्या अधिक असली पाहिजे, असे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगत होते. यावेळी आमदार भरणे म्हणाले की, जन सन्मान यात्रेला आपापल्या बायका घेऊन या… ‘मी माझी बायको आणणार आहे. ती कधी बाहेर येत नाही पण मी तिला आणणार आहे.’आमदार भरणे पदाधिकाऱ्यांना नाव घेऊन सांगू लागले की बायकोला घेऊन या.
ते म्हणाले की, व्हाटस्अपला सगळ्यांनी मेसेज पाठवा… महिला भगिनींच इतकं सगळं चांगलं झालंय की, त्यामुळं महिला भगिनी जास्तीत जास्त संख्येने हजर पाहिजेत. तुमची बायको घेऊन या. सोबतच दुसरी कोणी असेल तर तिलाही घेऊन या… आमदार भरणेंच्या या वाक्याने एकच हशा पिकला. तेव्हा तिथेच उपस्थित काहींनी दुसरी म्हणजे तुमच्या बहिणींनाही सोबत घेऊन या, अशी लागलीच सारवासारव केली.