पुणे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. एका शेतकरी दाम्पत्याने आपल्या दीड वर्षीय चिमुकलीसमोरच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना तालुक्यातील रांजणगाव खुरी गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
राजू दामोधर खंडागळे आणि अर्चना राजू खंडागळे असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. गरिबी आणि आर्थिक विवंचनेतून संसाराचा गाडा हाकताना आलेल्या नैराश्यातून या शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार रोजी दोघे पती-पत्नी आपल्या बाळाला घेऊन शेतात गेले होते. सायंकाळी अंधार पडला तरी ते घरी आले नाही. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा त्यांना दोघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा पती-पत्नीने गळफास घेतला तेव्हा दीड वर्षाची चिमुकली त्यांच्यासोबतच होती. तिला बाजूला झोपवून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं संपूर्ण पैठण तालुका हादरवून गेला असून परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, बिडकीन पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत