Purandhar Big Breaking!            कर्ज फेडुनही तारण ठेवलेल्या मिळकतीच्या जप्तीची नोटीस;पुरंदरचे माजी “आमदार” यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची बनावट सही

Purandhar Big Breaking! कर्ज फेडुनही तारण ठेवलेल्या मिळकतीच्या जप्तीची नोटीस;पुरंदरचे माजी “आमदार” यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची बनावट सही

पुणे

पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच कंपनीतील संचालकांची बनावट सही करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

या प्रकरणी एका खासगी वित्तीय संस्थेतील अधिकाऱ्यांसह चार जणांविरोधात बंडगार्डन पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजवर्धिनी संजय जगताप (वय ४३, रा. सासवड) यांनी तक्रार दिली आहे. बँकेच्या तीन खात्यांवर ३० कोटींचे कर्ज वितरित झाल्याचे दाखविण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, राजवर्धिनी जगताप यांनी २०११ मध्ये व्यावसायिक कामानिमित्त एका खासगी वित्तीय संस्थेकडून ३० कोटींचे कर्ज घेतले होते. २०१८ पर्यंत त्यांनी कर्जाची परतफेड केली. संबंधित खासगी वित्तीय संस्था आणि अन्य एका कंपनीचे नंतर एकत्रीकरण झाले.

खासगी वित्तीय संस्थेत सुरुवातीला काम करणारे आरोपी नंतर या कंपनीत रुजू झाले. २०२३ मध्ये या कंपनीकडून जगताप यांच्या कंपनीच्या संचालकांना कर्ज न फेडल्याची नोटीस मिळाली. तारण ठेवलेली मिळकत जप्त करण्यात येणार आहे, असे नोटिशीत म्हटले होते. याबाबत चौकशी केल्यावर कर्ज प्रकरणावर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या तसेच कंपनीच्या संचालकांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचे आढळले.

त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करत आहेत. आरोपींनी तीन बँक खात्यांवर एकूण ३० कोटींचे कर्ज वितरित केल्याबाबत बनावट कागदपत्रे तयार केल्याचे राजवधिनी जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार अर्ज आला होता. तक्रार अर्जाची प्राथमिक चौकशी करून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल:रवींद्र गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,बंडगार्डन पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *