पुणे
यवत पोलिस स्टेशनमधील कर्मचारी निखिल रणदिवे स्वतःहून घरी परतल्याची माहिती समोर आली असून गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली तणावाची परिस्थिती अखेर निवळली आहे. रणदिवे यांच्या सुखरूप परतण्याने त्यांच्या परिवारासह संपूर्ण पोलिस यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला आहे.
सुमारे आठवड्यापूर्वी निखिल रणदिवे यांनी सोशल मीडियावर भावनिक सुसाईड नोट टाकत, “यवत पोलिस अधिकारी नारायण देशमुख मला वर्षभर त्रास देत आहेत… आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा” असा उल्लेख केला होता.यानंतर त्यांनी फोन बंद केला आणि ते अचानक गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
रणदिवे गायब झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मुलांसह थेट यवत पोलिस स्टेशनमध्ये धावल्या.व्यथित अवस्थेत त्यांनी मानसिक छळाचा आरोप करत संतापाने विचारले होते,माझा नवरा कुठे आहे? पोरांचा बाप आत्ताच्या आत्ता पाहिजे,ही घटना डीवायएसपी बापूराव धडस यांच्या उपस्थितीतच घडली. त्यामुळे प्रकरण आणखी संवेदनशील झाले. धडस यांनाही टीकेचा सामना सुद्धा करावा लागला.
या प्रकरणाची चर्चा राज्यभर पसरली.काही राजकीय नेत्यांनी मोर्चे आणि आंदोलनांची तयारी केली होती.दरम्यान, रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके कामाला लावली होती, मात्र कोणताही ठसा लागत नव्हता.रणदिवे यांच्या परिवाराने पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली होती.
यवत पोलिसांवरील आरोपांमुळे विभागात चुळबुळ वाढली होती.
10 डिसेंबरच्या मध्यरात्री निखिल रणदिवे स्वतःहून घरी परतला.
त्यांच्या परतीची माहिती मिळताच संपूर्ण पोलिस यंत्रणेला दिलासा मिळाला.परिवाराच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव परतले आणि गेल्या आठवडाभराचा मानसिक ताण संपुष्टात आला.
या प्रकरणामुळे यवत पोलिस ठाण्याच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.रणदिवे यांच्या पोस्टमधील आरोप, त्यांचा मानसिक ताण, आणि अंतर्गत पोलिस विभागातील तणाव यांची चौकशी होणे आवश्यक असल्याच्या चर्चा सुरू आहेत.निखिल रणदिवे सुखरूप परतला, पण त्याच्या वेदनेची कारणे मात्र अजूनही सावलीसारखी प्रकरणामागे उभी आहेत.

