Eknath Shinde ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांनादिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

Eknath Shinde ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांनादिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

पुणे

गेल्या काही दिवसांपासून कांदा, भाजीपालासह इतर शेतीमालाच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यात पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापला असून सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही.

कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. अशातच सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती.समितीने २०० आणि ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *