पुणे
पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस भरती येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.३ जानेवारीपासून पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरू असून भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.
अशातच,पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पुण्यातील पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
पुणे पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे, असं उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितलं आहे.
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.