पुणे
वारजे माळवाडी भागात आठवड्यापूर्वी पुणे जिल्हा शिवसेनेच्या युवासेनाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता.सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते,पण पोलिसांनी या गोळीबाराची गंभीर दखल घेत तपासाची सुत्रे फिरवली.
पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून निलेश घारे यांनी स्वत:च गोळीबाराचा बनाव रचल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे माळवाडी भागात 19 मे रोजी रात्री 12 वाजता पुणे जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता.
निलेश घारे हे आपले काम संपवून घराकडे निघाले होते. त्यावेळी मित्रांसोबत ते माळवाडी येथील गणपती माथा परिसरातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात ते आले होते. त्यावेळी कार्यालयाच्या बाहेर पार्किंग केलेल्या त्यांच्या काळ्या रंगाच्या कारवर दोन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते. या गोळीबाराची तक्रार दिल्यानंतर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते.पोलिसांनी रविवारी (25 मे) रात्री वारजे भागातून 3 जणांना ताब्यात घेतले.
सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ असे अटक केलेल्या तीन आरोपींची नावे असून गोळीबार प्रकरणी संकेत मातले हा फरार आहे. वारजे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी 3 आरोपींची चौकशी केली असता त्यांनी निलेश घारे यांच्या कारवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक म्हणजे निलेश घारे यांनी स्वत: हा गोळीबार करायला लावल्याचा खुलासाही आरोपींनी केला आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत.
कारण काही दिवसांपूर्वी निलेश घारे यांनी जिल्हाध्यक्ष असल्याने पोलीस संरक्षण आणि शस्र परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे आता निलेश घारे यांनी पोलीस संरक्षण आणि शस्र परवाना मिळविण्यासाठी गोळीबार घडवून आणला का? याचा तपास वारजे पोलीस करत आहेत.