हळहळजनक!!!!!लेकीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का, तेराव्याच्या दिवशी आई गेली;दोघींच्या जाण्याने बापासह लेकानेही जीव सोडला,महिनाभरात पुर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड……

हळहळजनक!!!!!लेकीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का, तेराव्याच्या दिवशी आई गेली;दोघींच्या जाण्याने बापासह लेकानेही जीव सोडला,महिनाभरात पुर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड……

नाशिक

पंचवीस दिवसांपूर्वी आजारपणामुळे नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तिच्या तेरावीचा विधी होतानाच आईला आजारपणामुळे देवाज्ञा झाली. या दोघींच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकालाही काळाने गाठले. या दोघांचे एकाच दिवशी; सोमवारी निधन झाले. अवघ्या महिनाभरात पाथर्डी फाटा परिसरातील वासननगरातील हसते खेळते महाजन कुटुंब काळाच्या पडड्याआड गेले.

सुखी कुटुंबाच्या या करुण अंतामुळे अवघे शहर हळहळले आहे.जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोना येथील मूळ रहिवाशी असलेले महाजन कुटुंब दोन-अडीच वर्षांपासून वासननगरात वास्तव्यास होते. या कुटुंबातील तुषार अरुण महाजन (वय ४०) व त्यांचा मुलगा कार्तिक (वय १३) यांचे सोमवारी निधन झाले.

तुषार हे खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होते. तुषार यांची कन्या हर्षदा (वय ९) हिच्या डोक्यात ताप गेल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पंचवीस दिवसांपूर्वी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हर्षदाच्या आजारपणातील निधनामुळे महाजन कुटुंबाला धक्का बसला.

कन्येच्या मृत्यूमुळे अतीव दु:खात असलेल्या आई स्वाती (३५) या आजारी पडल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षदाची तेरवी झाली त्याच दिवशी स्वाती यांची प्राणज्योत मालवली.

आई व मुलीच्या निधनामुळे खचलेल्या तुषार व कार्तिक यांना धीर देण्यासाठी नातलगांनी बरेच प्रयत्न केले. मुलाकडे बघून या दु:खातून बाहेर पडा, स्वत:ला सावरा अशा शब्दांत आप्त धीर देत होते. मात्र झालेला आघात तुषार यांना सोसवला नाही. कार्तिकही या धक्क्यातून सावरला नाही. दोघेही दु:खाच्या खाईत लोटले गेले. सोमवारी या दोघांचा अचानक मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

नातलगांसाठी हे फारच धक्कादायक होते. संपूर्ण परिसर या घटनेमुळे हळहळत आहे.तुषार यांचा भाचा काही दिवसांपासून त्यांच्याकडेच वास्तव्याला होता. सोमवारी या भाच्याला दोघेही मृतावस्थेत असल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक शरमाळे व त्यांचे सहकारी दाखल झाले.

दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्येची शक्यता नसल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी वर्तविला. शवविच्छेदनाचा अहवाल रात्री उशिरा पोलिसांना प्राप्त झाला. पोलिसांनी आकस्मात मृत्यू नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *