पुणे
पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने पतीच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशीच ओढणीच्या साहाय्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे गुरुवारी (दि.९) पहाटे घडली. अनिता निखिल घोंगडे (वय – 23) असे विवाहितेचे नाव आहे.
लग्नानंतर अवघ्या एका महिन्यात ही घटना घडल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे.वाढेगाव येथील निखिल घोंगडे याचा 5 डिसेंबर 2024 रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता. घरी मंगलकार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, मंगळवारी (दि.7) निखिलचे अल्पशा आजाराने निधन झाले.
यामुळे पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसल्याने ती निःशब्दहोती. बुधवारी निखिल याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. रात्री घोंगडे कुटुंबीय आणि अनिता असे सर्वजण घरात झोपले होते.
गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने झोपेतून उठून घराच्या पाठीमागील पत्राशेडमधील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.दरम्यान, घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता न दिसल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता, तिने पत्राशेडमध्ये गळफास घेतल्याचे दिसले.
नातेवाईकांनी तिला खाली उतरवून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
सांगलीतील मिरज तालुक्यातील मालगाव येथील निखिलची आत्या वंदना शिरसावड यांची अनिता ही मुलगी होय, तर निखिल मामा दिगंबर घोंगडे यांचा मुलगा होता. अनिताला मामाच्या मुलाशी लग्न करायचे होते, त्यामुळे घरातील नातेसंबंधांमुळे 5 डिसेंबर रोजी दोघांचा विवाह झाला होता. मात्र, अवघ्या एकाच महिन्यात त्यांच्या संसाराला दृष्ट लागली.