पुणे
बदलापुरच्या शाळेत लैगिंक अत्याचारानंतर शहरात संतप्त नागरिकांनी आंदोलन करत रेलरोका केला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या घोषणा करण्यात आल्या. हे प्रकरण निवळत नाही, तोपर्यंत अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लिल व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली.
याप्रकाराने जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नावाच्या शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडिओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे.
चित्रफित दाखवत असताना त्याने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लिल संभाषण केले. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप या शिक्षकांवर विद्यार्थीनींनी केला आहे.आज मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी या घटनेसंदर्भात पालकांना सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे.
त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी या शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.