संगमनेर हल्ला प्रकरणाला नवं वळण : खताळ–गुंजाळ आर्थिक नात्याचा खुलासा

संगमनेर हल्ला प्रकरणाला नवं वळण : खताळ–गुंजाळ आर्थिक नात्याचा खुलासा

अहमदनगर ( प्रतिनिधी )

राज्यभर गाजलेल्या संगमनेर आमदार अमोल खताळ हल्ला प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे. हल्लेखोर प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याची आई अनिता आप्पासाहेब गुंजाळ यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आमदार अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण व आर्थिक संबंध उघडकीस आणले आहेत.अनिता गुंजाळ यांनी स्पष्ट केले की, “घटनेचे समर्थन मी करत नाही. मात्र हल्ल्याचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. ही घटना केवळ आर्थिक देवाणघेवाण व फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर घडली आहे.”

तक्रारीतले मुख्य मुद्दे
आमदार अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ हे अनेक वर्षांपासून घनिष्ट मित्र. कौटुंबिक कार्यक्रम, वाढदिवस त्यांनी एकत्र साजरे केले.
शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी अमोल खताळ यांच्या मध्यस्थीने मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार झाले. व्यवहारांची नोटरी खताळ यांच्या कार्यालयात झाली.
अमोल खताळ यांनी प्रसाद गुंजाळकडून कोरे चेक घेतले, ज्यामुळे प्रसादला सतत मानसिक त्रास, दबाव व ब्लॅकमेल सहन करावा लागला.
वारंवार पोलीस गाड्या घरी पाठवून प्रसादवर दडपण आणले गेले. त्यामुळे त्याने आत्महत्येचाही विचार केला होता.

जोडलेले कागदपत्रे
अनिता गुंजाळ यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीसोबत खालील पुरावे जोडले आहेत :
नोंदणीकृत दस्त (18 मार्च 2024) – अमोल खताळ यांच्या कार्यालयात 32 लाख 50 हजार रुपयांची देवाणघेवाण झाल्याची नोंद.
हा व्यवहार 21 ऑक्टोबर 2023 रोजी विक्रमसिंह गुंजाळ यांच्या उपस्थितीत झाल्याचे स्पष्ट.
प्रसाद गुंजाळला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घडवून आणण्यासाठी अमोल खताळ यांनी दिलेले शिफारस पत्र.

अनिता गुंजाळ म्हणाल्या, “माझ्या मुलाला अमोल खताळ यांनी अनेकदा फसवले. त्याच्या वाट्याची जमीन विकून पैसे परत केले, तरीही पुन्हा चेक टाकून त्याला फसवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर सतत धमक्या व दबाव टाकण्यात येत होता. अखेर उद्विग्न अवस्थेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मी त्याचे समर्थन करत नाही, मात्र त्याला या अवस्थेत नेणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही.”या प्रकरणी अनिता गुंजाळ यांनी आमदार अमोल धोंडीबा खताळ, संदेश देशमुख यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सुरुवातीला हल्ला प्रकरण राजकीय असल्याचे भासवले गेले. संगमनेरमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले. मात्र आता समोर आलेल्या पुराव्यानंतर हे प्रकरण व्यक्तिगत आर्थिक वादाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रसाद गुंजाळ याने आपल्या अडचणींसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मदतीसाठी संपर्क साधला होता. मात्र मदत न मिळाल्याने तेही दोषी असल्याचा आरोप अनिता गुंजाळ यांनी केला.या सर्व घडामोडीनंतर आता पुढील चौकशीतून खरे सत्य बाहेर येणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *