पुणे
यंदा त्याचा वाढदिवस छान साजरा करायचा म्हणून कुटुंबीयांनी आणि मित्रानी तयार सुरू केली होती.आईने लाडक्या लेकासाठी कपडे तर बहिणीने घड्याळ खरेदी केले होते मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते वाढदिवसाला खर्च करण्यासाठी दोन पैसे हातात राहावे म्हणून तो थेरगाव येथे लाईटचे काम करत होता अचानक ॲल्युमिनियमच्या शिडीला करंट असलेल्या केबलचा धक्का लागला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. वाढदिवसाच्या दिवशीच अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्याचे कुटुंब व मित्रमंडळींवर आली.
सोनू उर्फ दीपांकर सुधाकर रोकडे (वय 24 रा.आंबेडकर नगर देहू रोड मुळ गाव आंबळे ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोनू हा बीबीजी कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. रविवारी थेरगाव येथील सोसायटीच्या जनरेट रूम मध्ये विद्युत बल बसवण्यासाठी तो शिडी वर चढला तेवढ्यात अतिउच्च विद्युत वाहिनीचा शिडी ला स्पर्श झाला. मोठा आवाज आणि धुर झाला. काही कळायच्या आत सोनू खाली कोसळला.
जखमी सोनूला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोनू हा मनमिळावु असल्याने मित्रमंडळींना तो प्रिय होता त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा बेत मित्रांनी आखला त्याच्या आईने वाढदिवसाला कपडेही घेतले तर बहिणीने भावासाठी त्याच्या आवडीचे घड्याळ घेतले. परंतु तो सर्वांना सोडून गेल्याची बातमी मिळताच त्याच्या कुटुंब आणि मित्रपरिवाला धक्का बसला.
वाढदिवसाकरता आईने घेतलेले नवीन कपडे त्याच्या अंत्यविधीला घालावे लागले. तर बहिणीने आणलेल्या घड्याळात वेळ पाहण्याइतका वेळ देखील त्याच्याकडे उरला नाही. मित्राचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी अंत्यविधी करतोय,या भावनेतून त्याच्या मित्रांनाही अश्रु अनावर झाले.