लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात, अर्ज न करताही तीन हजार जमा,दादा म्हणतो……….

लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात, अर्ज न करताही तीन हजार जमा,दादा म्हणतो……….

पुणे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी आटापिटा करावा लागला. अखेर स्वातंत्र्यदिनाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले असल्याचे मेसेज मोबाईलवर आले. रक्षाबंधन पूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाल्याने उत्साहाला पारावार उरला नाही. पण दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम एका पुरुषाच्या खात्यात जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता ना कोणती कागदपत्रे दिली, तरी ती रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली आहे.यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील जाफर गफ्फार शेख असं या तरुणाचे नाव आहे. जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या प्रकरणमुळे योजनेतील भोंगळ कारभार समोर आला आहे.जाफर शेख सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नसताना त्यांच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले. खात्यात जमा झालेली रक्कम पाहून तो चक्रावून गेला. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी दिवसभर रांगेत थांबून अर्ज भरला, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ केली.

मात्र बँक खात्याला आधार लिंक नसल्याने अनेक पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. दुसरीकडे कोणताही अर्ज न करता एका पुरुषाच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर जाफर शेख म्हणाला की, ”सरकारच्या लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होत आहेत. तसाच एक मेसेज माझ्या मोबाईलवर आला आणि माझ्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याचं समजलं. हे खातं मी २०१२ मध्ये उघडलं होतं. मात्र बँक गावापासून दूर असल्याने व्यवहार करत नाही.

मोबाईलवर मेसेज पाहून मी यवतमाळला गेलो आणि बँकेचे स्टेटमेंट घेतलं. त्यानंतर समजलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र, यासाठी मी कोणताही अर्ज केलेला नाही. कुठेही कागदपत्रे दिली नाही. तरीही हे पैसे कसे जमा झाले याची चौकशी व्हावी”, अशी मागणी जाफर शेख याने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *