“या” नवर्‍याचं अवघडच झाल!!!!!बायको हरवल्याची तक्रार द्यायला गेला अन् बालविवाहाच्या गुन्ह्यात अडकला

“या” नवर्‍याचं अवघडच झाल!!!!!बायको हरवल्याची तक्रार द्यायला गेला अन् बालविवाहाच्या गुन्ह्यात अडकला

बीड

आतापर्यंत आपण एखाद्या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील व्यक्ती हरवल्याची तक्रार दिली तर त्यांना ती व्यक्ती मिळाल्याच्या घटना, बातम्या पाहिल्या असतील. मात्र एका व्यक्तीला आपली बायको हरवल्याची तक्रार देणं चांगलचं महागात पडलंय. तक्रार दिल्यानंतर तपासाअंती चक्क तक्रारदार पतीसह 10 जणांच्या हातात बेड्या पडल्या आहेत.बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह झाला तर अल्पवयातच मुलीचे लग्न झाल्यानंतर, तिला एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत.समाजातील नागरिकांची जनजागृती केली जात आहे.

मात्र तरी देखील बालविवाह लावले जातात. महाराष्ट्रात बीड जिल्हा हा बालविवाहामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे सगळं असताना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये अवघ्या तेराव्या वर्षीच मुलीचा बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात शहरातील कृष्णा शेटे वय 34 वर्ष या विवाहित तरुणाने तक्रार दिली, की माझी 19 वर्षीय पत्नी हरवली आहे. तीचा आम्ही शोध घेतला, मात्र आम्हाला ती मिळून आली नाही. त्यामुळं तिचा तपास करावा, अशी फिर्याद पती असणाऱ्या कृष्णाने दिली होती.त्यानंतर धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, विजय आटोळे यांनी तपासाला गती देत शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान ती अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री येथे परळीच्या रोहित लांबूटे या तरुणासोबत मिळून आली.

त्यानंतर पोलिसांनी विवाहितेसह तिच्यासोबत असणाऱ्या रोहित लांबूटेला धारूर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर चौकशी केली असता ती स्वतःहून रोहित लांबूटे याच्यासोबत गेल्याचं तिने सांगितलं. मात्र, या दरम्यान पोलिसांना संबंधित विवाहितेचे वय कमी असल्याचा संशय आल्याने, तिच्या आधार कार्डची तपासणी करण्यात आली. यावेळी त्या आधार कार्डवर तिची जन्मतारीख 24 एप्रिल 2008 असून ती अल्पवयीन असल्याचं समोर आलं. तर याविषयी पोलिसांनी विवाहितेच्या शाळेत जाऊन चौकशी केली, असता ती केवळ 14 वर्ष 9 महिन्याची असल्याचं समोर आलंय.

दरम्यान, ही माहिती समोर येतात धारूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी, दीक्षा चक्रे यांच्या फिर्यादीवरून, बीडच्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये, 34 वर्षीय पती कृष्णा शेटे याच्यासह, बालविवाह लावून देणारे अल्पवयीन विवाहितेच्या मामा-मामी, आई-वडील, भाऊ तर पती असणाऱ्या कृष्णा शेटे याच्या आईसह नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.दरम्यान, बायको हरवल्याची तक्रार द्यायला गेला अन् बालविवाहाचा गुन्ह्यात अडकला असा प्रकार कृष्णा शेटे यांच्या बाबतीत घडला आहे. कृष्णा शेटे याने बायको हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र माहिती असूनही अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याचे त्याने लपवून ठेवले. यामुळे तक्रार द्यायला गेले आणि आरोपी बनले, अशी गत कृष्णा शेटे यांची झाली आहे. तर विवाहितेसोबत सापडलेल्या रोहित लांबूटे याच्या विरोधात तक्रार नसल्याने तो अलगद बाजूला निघाला आहे.

दरम्यान या सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी चाइल्डलाईनचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केलीय.दरम्यान बायको हरवल्याची तक्रार देणं पती असणाऱ्या कृष्णा शेटेला चांगलंच महागात पडलंय. अल्पवयात मुलीचे हात पिवळे करणाऱ्या 10 व्यक्तींच्या हातात पोलिसी बेड्या पडल्या. यामुळे या बालविवाहाची अनोखी चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे. मात्र तुम्ही जर बालविवाह करण्याच्या प्रयत्नात असाल तर खबरदारी घ्या आणि बालविवाह टाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *