पुणे
बिबट्याच्या नावाखाली महिलेचा खून महिलेच्याच नातेवाईकांनी केल्याचे तब्बल दोन महिन्यांनी यवत पोलिसांनी आणि नागपूरच्या सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेने उघडकीस आणले आहे..अत्यंत शिताफीने व कानून के हात बहुत लंबे होते है याचा प्रत्यय देणारी ही घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील आहे. 10 डिसेंबर 2024 रोजी यवत पोलीस ठाण्याच्या पाटस पोलीस चौकीत फौजदार सलीम गफूर शेख काम करत होते. त्याचवेळी त्यांना अनिल पोपट धावडे या 40 वर्षीय व्यक्तीने खबर दिली.
7 डिसेंबर 2024 रोजी सकाळी चुलते बबन धावडे व चुलती लता बबन धावडे हे वरवंड येथील गट नंबर 972 येथील शेतामध्ये कामाकरता गेले होते. दुपारी जेवण करून चुलतीने बबन धावडे यांना तुम्ही गवत कापून या, तोपर्यंत मी कांद्याचे रोपातील गवताची खुरपणी करते असे म्हणत दुपारी पावणेतीन वाजता गवत काढण्यासाठी गेल्या आणि त्यानंतर पत्नी का अजून आली नाही म्हणून पाहण्यासाठी चुलते चार वाजता गेले, मात्र पत्नी कोठे दिसली नाही.हाका मारूनही पत्नीचा प्रतिसाद मिळत नसल्याने पुतण्या अनिल पोपट धावडे याला चुलत्याने बोलवून घेतले.
पत्नी लता दिसत नसल्याने पुतण्याला फोन करण्यास सांगितले. पुतण्या अनिल याने लता यांच्या मोबाईलवर फोन केला, मात्र फोन उचलला जात नव्हता. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना घेऊन परिसरातील शेतात पाहणी करायला सुरुवात केली, तेव्हा पुतण्या अनिल याला शेजारील दादा दिवेकर यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्याचा आवाज आला. त्यावरून दिवेकर यांच्या शेतात शोधण्यास सुरुवात केली आणि बांधाच्या कडेला चुलती लता धावडे ही पाठीवर झोपलेल्या रक्ताळलेल्या अवस्थेत दिसली. तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.
54 वर्षीय लता धावडे यांना बिबट्यानेच मारले असावे म्हणून दौंड चे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे व शितल मेरगळ यांना फोन करून घटनेची माहिती दिली. वनखात्याचे कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी पोहोचले. त्यांनी पाहणी केली. पंचनामा केला. त्याचबरोबर शव तपासणी केल्यानंतर लता धावडे यांच्या शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला. त्याचबरोबर लता धावडे यांना बिबट्याने जिथे चावा घेतला, तेथील लाळेचा नमुना प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवण्यात आला.
दरम्यान जिल्ह्यामध्ये सगळीकडे खळबळ उडाली. बिबट्या नरभक्षक बनल्याची चर्चा सुरू झाल्याने शेतकरी हवालदिन झाले. त्याची चर्चा राज्यभरात वरिष्ठ नेत्यांपर्यंत देखील पोहोचले. वन खात्याने येथे पिंजरे लावले. दरम्यान ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालात मात्र महिलेचा मृत्यू हा डोक्याला आणि तोंडाला जखम झाल्यामुळे झाला असल्याचे दिसून आले. हा अहवाल आल्यापासून पोलिसांना थोडा संशय निर्माण झाला होतामात्र नागपूरच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे लाळेच्या नमुन्याबाबत येणाऱ्या अहवालासंदर्भात प्रतिक्षा होती.
8 फेब्रुवारी 2025 रोजी त्याचा तपासणी अहवाल आला. त्यामध्ये कोणत्याही प्राण्याने चावा घेतला नसून तशा स्वरूपाचा कोणताही लाळेचा नमुना या ठिकाणी आढळून आला नसल्याचे फॉरेन्सिक तपासणीत दिसून आले होते. हा अभिप्राय मिळाल्याने या महिलेचा मृत्यू हा बिबट्याने चावा घेतल्याने झाला नसून याला वेगळेच काहीतरी कारण असावे असा पोलिसांना संशय आला आणि त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू झाला.
3 मार्च 2025 रोजी हा तपास सुरू असताना फौजदार शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली. धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तिकी या गावचा सतीलाल वाल्मीक मोरे हा तीस वर्षीय मजूर पोलिसांना संशयास्पद वाटला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याने घडाघडा या खुनाची कबुली दिली. अनिल पोपट धावडे आणि त्याची चुलती लता धावडे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. ते शेतामध्ये वारंवार एकमेकांना भेटत होते. 7 डिसेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कडेठाण गावच्या हद्दीत मालक अनिल धावडे यांच्या गोठ्यावर काम करत असताना अनिल धावडे यांनी मला बोलावले आणि सांगितले की, माझी चुलती लता बबन धावडे ही मला भेटायला येत नाही आणि वरून पैशाची मागणी करते.
तुला मी दीड लाख रुपये देतो. आपण दोघे मिळून तिचा खून करू. तू मला मदत कर असे म्हणाल्यानंतर या दोघांनी जीवे मारण्याचा कट रचला आणि अनिल धावडे यांच्या सांगण्यावरून लता धावडे हिला उसाच्या शेताजवळ बोलावून तिचे तोंड दाबले. तिला बेशुद्ध केले आणि दोघांनी मिळून दगडाने चेहरा आणि डोके ठेचून खून केला व अनिल धावडे यांनी मोरे याला सांगितले की, कोणी विचारले तर बिबट्याने मारले असे सांग..तर असा हा बिबट्याच्या नावावर खपवलेला एका महिलेचा खून यवत आणि पाटसच्या पोलिसांनी आणि नागपूरच्या प्रयोगशाळेने ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अत्यंत निष्पक्ष रित्या केलेल्या तपासाने उघडकीस आणला.