पुणे
पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या तीन हजार एकर जमिनीवर टर्मिनल आणि दोन धावपट्ट्यांसाठी पूर्वीच्या आराखड्यानुसारच सुमारे दोन हजार २०० एकर जमीन कायम ठेवली आहे.त्यामुळे क्षेत्रफळानुसार देशातील दुसरे, तर राज्यातील सर्वांत मोठे विमानतळ ठरणार आहे. मालाच्या साठवणुकीपासून वाहतूक सुविधा देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक हबच्या जागेत कपात केली आहे.
पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला सुमारे सात हजार एकर जमिनीचे संपादन करण्याचे नियोजन होते. परंतु, शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने भूसंपादन क्षेत्रात चार हजार एकर क्षेत्र कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता विमानतळासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात मूळ विमानतळाबरोबर लॉजिस्टिक हबचाही समावेश आहे. मात्र, संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीत सुमारे साठ टक्के कपात केल्यानंतर मूळ विमानतळासाठी किती जमीन देण्यात येईल? याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता.
यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, ”पूर्वीच्या आराखड्यानुसार जमीन निम्म्याहून अधिक कमी केली असली, तरी विमानतळाच्या टर्मिनल धावपट्टीची जागा तीच कायम ठेवली आहे. यासाठी सुमारे दोन हजार २०० एकर जागा वापरण्यात येणार आहे. लॉजिस्टिक हबच्या जागेत मोठी कपात केली आहे.
लॉजिस्टिक हबमध्ये उद्योगांच्या मालाची साठवणूक, दळणवळण निर्यात यांसारखी कामे होतात. यात कंपन्यांना जागा दिली जाते. तसेच, भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विकसित भूखंडांसाठी सुमारे ३०० एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.’
विमानतळावर दोन धावपट्ट्या आहेत, त्यासाठी दोन हजार २०० एकर जमीन देण्यात येणार असून, ही जागा राज्यातील सर्वांत मोठी ठरली आहे. नवी मुंबईतील विमानतळासाठी एक हजार ३०० एकर जमीन वापरण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.