पुणे
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी जमीन देण्यास शेतकरी स्वतःहून पुढे येत आहेत. मागील १८ दिवसांत विमानतळ होणाऱ्या सात गावांमधील एक हजार ९८० शेतकऱ्यांनी सुमारे दोन हजार ३० एकर क्षेत्रासाठी संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेत.एकूण क्षेत्राचा विचार करता, तब्बल ७२ टक्के क्षेत्राची संमती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे,” अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वी या सातही गावांतून सुमारे सात हजार एकर भूसंपादन करण्यात येणार होते. त्यामध्ये कपात करून राज्य शासनाकडून तीन हजार एकर भूसंपादन करण्यात येणार आहे.
भूसंपादनासाठी २५ ऑगस्टला संमतिपत्रे स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल ७६० शेतकऱ्यांनी सुमारे एक हजार ७० एकर क्षेत्रासाठी संमतिपत्रे दिली. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत, आतापर्यंत दोन हजार ३० एकर म्हणजे ७२ टक्के जमिनींची भूसंपादासाठीची संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाकडे आली आहेत.
ज्या जागामालकांनी भूसंपादनासाठी संमतिपत्रे सादर केली आहेत, त्या जागामालकांचा परतावा निश्चित झाला आहे. विमानतळासाठी संमती देण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुरंदर विमानतळ
• एकूण संपादन क्षेत्र
• सुमारे ३ हजार एकर
• संमतिपत्रे दिलेले क्षेत्र
• सुमारे २ हजार ३० एकर