पुणे
विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. अनेक शिक्षक नेते रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मतदार नोंदणी सध्या जोरात सुरु आहे. या दरम्यान राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांचे नाव चर्चेत आहे. तर ते महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
यादरम्यान प्राचार्य नंदकुमार सागर यांना शिक्षण चळवळीतील शिक्षकांचे नेतृत्व करणारा चेहरा असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कौतुक केले आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.प्राचार्य सागर हे शिक्षकांच्या समस्यांची जाण असणारे आणि गेली तीन दशके शिक्षक संघाचे काम करणारे नेते आहेत. सातत्याने मोर्चे, आंदोलने यातून त्यांनी शिक्षक-शिक्षकेतरांसाठी न्याय भूमिका घेतली आहे.
त्यांना विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे, मतदार नोंदणीतही आघाडी घेतली असून भाजपाकडून त्यांनी जोरदार तयारी केली आहे.प्राचार्य सागर यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असून, ते महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ते प्राचार्य आहेत. तर प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या विरोधात विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार दत्ता सावंत हे मैदानात उतरणार हे निश्चित आहे.
माजी आमदार दत्ता सावंत यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, ‘शिक्षक भारती’चे पुणे विभागीय अध्यक्ष दादा लाड, महाराष्ट्र राज्य विनाअनुदान कृती समितीचे खंडेराव जगदाळे, विजयसिंह माने, बाबासाहेब पाटील, दौलत देसाई, अमोल काळे, कौस्तूभ गावडे, जे. के. थोरात, भरत रसाळे यांच्यासह अनेक जण रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. किमान 80 हजारापर्यंत मतदार नोंदणी होण्याची शक्यता आहे.