पुणे
कर्तव्य पालनात जाणीवपूर्वक कसूर व हलगर्जीपणा केल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ग्रामपंचायत संगमनेर (ता. भोर, जि. पुणे) च्या सरपंच श्रीमती सायली महेंद्र साळुंके यांना त्यांच्या उर्वरित कालावधीसाठी सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
हा आदेश ८ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आला. संगमनेर येथील रहिवासी हनुमंत राजाराम गायकवाड आणि निखिल हनुमंत गायकवाड यांनी सरपंच साळुंके यांच्या घरातील सदस्यांनी वहिवाटीच्या रस्त्यावर अनधिकृत बांधकाम करून जीना काढल्याबद्दल तक्रार केली होती.
सरपंच यांना कळवूनही त्यांनी कार्यवाही केली नाही. याप्रकरणी झालेल्या चौकशीत, सरपंच यांच्या सासऱ्यांनी सक्षम प्राधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता बांधकाम केल्याचे उघड झाले. तसेच, ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ५२ अन्वये आवश्यक असलेली कोणतीही ठोस किंवा नियमोचित कार्यवाही केली नाही.
विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्या अहवालाचे व दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाचे अवलोकन केल्यानंतर सरपंच सायली महेंद्र साळुंके यांनी पदाच्या विहित कर्तव्य पालनात कसूर व हलगर्जीपणा केल्याचे मत नोंदवले. त्यानुसार, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम ३९ (१) नुसार त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे

