माझ्या भावना मुख्यमंत्र्यांना सांगितल्या, त्यांनी दोन दिवस शांत राहा म्हणून सांगितलं : विजय शिवतारे

माझ्या भावना मुख्यमंत्र्यांना सांगितल्या, त्यांनी दोन दिवस शांत राहा म्हणून सांगितलं : विजय शिवतारे

पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पंगा घेऊन बारामती लोकसभेसाठी शड्डू ठोकलेल्या शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे शिवतारे यांनी बैठकीनंतर सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पुण्याहून हेलिकॉप्टने आलेले विजय शिवतारे यांना जवळपास सात तास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत बसावे लागले. अखेर रात्री साडे आठ वाजता शिवतारे यांच्यासह पुरंदरमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

शिवतारे यांनी बारामतीमधील सध्याची राजकीय परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकून अपक्ष लढण्यामागची भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. माझ्याबरोबर पुरंदरचे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य असे सगळे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते होते.

आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना (एकनाथ शिंदे) आम्हाला होत असलेला त्रास सांगितला. आमच्या भावना त्यांना कळविल्या. त्यांनी दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला. दोन दिवसानंतर पुन्हा निवडक पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा होणार आहे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.

गुरुवारी दुपारी बारा वाजल्यापासून भेटीसाठी आलेल्या विजय शिवतारे यांना सात तास वेटिंगवर राहावे लागले. रात्री साडे आठ वाजता उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांवर गंभीर आरोप केले होते. थेट अजित पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांना मुंबईत बोलावून घेतले.

पुण्यावरून थेट हेलिकॉप्टरने मुंबईत येत दुपारी बारा वाजता ते वर्षा बंगल्यावर पोहोचले. यादरम्यान मुख्यमंत्री हे ‘वर्षा’ बंगल्यावर नसून त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी होते. त्यामुळे शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांची सात तास वेटिंग करावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *