बाप नाही हा तर हैवान!                           आधी दोन मुली,तिसरीही मुलगी झाल्याने नराधम बापाने आठ दिवसाच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखु टाकुन केली निर्घृण हत्या

बाप नाही हा तर हैवान! आधी दोन मुली,तिसरीही मुलगी झाल्याने नराधम बापाने आठ दिवसाच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखु टाकुन केली निर्घृण हत्या

पुणे

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आधी दोन मुली, त्यात तिसरीही मुलगी झाल्याने नराधम बापाने ८ दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू टाकून तिची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर त्याने परस्पर मृतदेहाची विल्हेवाटही लावली.

आशा सेविकांच्या सतर्कतेने ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटना उघड होताच पोलिसांनी नराधम बापास गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (वय ३० वर्ष) असे या नराधम बापाचे नाव आहे.

घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोकुळ जाधव हा हरिनगर तांडा येथील रहिवासी आहे. त्याला दोन मुली आहेत. शनिवारी (२ सप्टेंबर) वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या पत्नीने तिसऱ्या मुलीला जन्म दिला.

काही दिवसांनी पत्नी आणि नवजात बाळ घरी आलं. सलग तिसरी मुलगी झाल्याने गोकुळच्या मनात प्रचंड संताप होता. तो तिसऱ्या मुलीचं तोंडही बघत नव्हता. अखेर १० सप्टेंबर रोजी गोकुळने अवघ्या ८ दिवसांच्या लेकीच्या तोंडात तंबाखू कोंबली त्यानंतर तिला झोळीत टाकलं.

या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने फर्दापूर-वाकोद रस्त्यालगत एक खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरून टाकला. धक्कादायक बाब म्हणजे गोकुळच्या पत्नीनेही याबाबत कोणालाही सांगितलं नाही. दरम्यान, हत्येच्या दोन दिवसांनी आशा सेविका नवजात बाळाची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या.

बाळ कुठं आहे असं विचारल्यानंतर आरोपी आणि त्याच्या पत्नीने उडवाउडवीची उत्तरे दिली. आजारपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असंही आरोपीने आशा सेविकांना सांगितलं. त्यामुळे आशा सेविकांना संशय आला आण त्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळवली.

दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी गोकुळच्या घरात धडक मारली. अखेर आरोपीने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *