प्रेरणादायक!!!!!      पतीचं निधन,पदरात दोन मुलं;घरासाठी केला ५० किमीपर्यंत पावाचा व्यवसाय,पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या सिंधूअक्काची  गोष्ट

प्रेरणादायक!!!!! पतीचं निधन,पदरात दोन मुलं;घरासाठी केला ५० किमीपर्यंत पावाचा व्यवसाय,पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या सिंधूअक्काची गोष्ट

पुणे

आपल्या आजूबाजूला प्रत्येक व्यक्तीची थक्क करणाऱ्या जीवनाच्या प्रवासाची कहाणी पाहायला मिळते, ऐकायला मिळते. मात्र १९८० च्या दशकामध्ये पुरुषप्रधान संस्कृती असताना पतीच्या निधनानंतर महिलेने संसाराचा गाडा एकटीने हाकला. एका महिलेने पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा हाकण्यासाठी, आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी चक्क पाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

५० किलोमीटरपर्यंत सायकल चालवून त्यांनी हा व्यवसाय केला. हा थक्क करणारा प्रवास आहे दौंड तालुक्यातील खुटबाव येथे राहणाऱ्या सिंधू अक्का यांचा. कोणतंही शिक्षण नसलेल्या सिंधू अक्का यांनी आपल्या मुला-बाळांसाठी समाजाची बंधनं तोडत आपलं जीवन यशस्वी केलं. त्यांच्या या जिद्दीला सलाम करावा तेवढा थोडाच आहे.

दौंड तालुक्यातील पारगाव येथे राहणारे आबासाहेब शेळके यांच्यासोबत १९८०च्या दशकात सिंधू अक्का यांचे लग्न झाले होते. आबासाहेब शेळके हे दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचे. तसेच गुराळ घरावर गुळ बनवण्याचे काम करायचे. पत्नी सिंधु अक्का या गृहिणी होत्या. १९८० मध्ये दापोडी येथे केडगाववरुन पारगावकडे येत असताना ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये आबासाहेब शेळके यांचे निधन झाले.

घरातील कर्ता पुरुष गेल्याने सिंधू अक्का यांच्यावर संपूर्ण घरची जबाबदारी आली. त्यांच्या मागे त्यांचा छोटा मुलगा उत्तम शेळके हा सव्वा महिन्यांचा होता, तर मोठा मुलगा भगवान शेळके हा अडीच वर्षाचा होता.पतीच्या दुःखात किती दिवस घरी बसायचे, हा विचार केला आणि पतीच्या निधनंतर अवघ्या तीन महिन्यात त्या घर चालवण्यासाठी घराबाहेर पडल्या.

८०च्या दशकामध्ये चूल आणि मुल अशी परिस्थिती असताना त्यांनी समाजाची सर्व बंधने तोडत, पाव विक्री व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पण पावांची विक्री करायची कशी हा प्रश्न समोर होता. मात्र त्यांना सायकल येत असल्याने त्यांनी त्यावेळी १०० रुपये किमतीची सायकल खरेदी केली.शाळेची पायरीही न चढलेल्या सिंधू अक्का या दररोज ५० किलोमीटर सायकल चालवत सायकलवरून दररोज भल्या पहाटे ‘पाव घ्या पाव, ताजे ताजे पाव’ अशी आरोळी देत पाव विकण्यास सुरुवात केली.

त्याकाळी महिलांनी सायकल चालवणे आणि पुरुषांची मक्तेदारी असणारा पाव विक्रीचा व्यवसाय करणे हे दौंड तालुक्यातील पहिलेच उदाहरण होते. समाजातील लोकांच्या अनेक टीका, अवहेलना पचवत सलग २२ वर्षे पाव विक्रीतून मिळालेल्या पैशातून प्रपंचाचा गाडा चालवला. आज त्यांच्या संघर्षामुळे शेळके परिवाराने यशाची शिखरे गाठली आहेत.

त्यावेळी सिंधू अक्का केडगाव येथे त्यांच्या घरी २० पावाच्या लाद्या आणायच्या. त्यावेळी १२ पावांची एक लादी असायची. दुसऱ्या दिवशी या लाद्या घेऊन त्या परिरात असणाऱ्या देलवडी, नागरगाव, नानगाव, न्हावरा या गावामध्ये पावांची विक्री करत असत. ज्यावेळी त्या २० पावांची विक्री करायच्या, त्यावेळी त्यांना २ रुपये मिळायचे.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी लोकांच्या गोधड्या शिवणे, सरपण गोळा करणे अशी कामे देखील आपला संसार चालवण्यासाठी केली.अशा परिस्थितित त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. आता यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे २ ट्रॅक्टर असून सिंधू आक्का यांचा छोटा मुलगा उत्तम शेळके हे नुकतेच २० वर्षे देशसेवा सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

तसेच नातवंडे उच्च शिक्षण घेत आहेत. पारगाव येथे स्थायिक असलेला शेळके परिवाराचा सिंधू आक्काच्या संघर्षामुळे समाजामध्ये नाव लौकिक निर्माण झाला आहे.इतकेच नाही तर सिंधुआक्का या आजही त्याच रुबाबात सायकल चालवतात. आज त्यांचे वय ७५ आहे, पण त्या आजही घरापासून शेतापर्यंतचा प्रवास सायकलवर करतात. याशिवाय आजच्या मोबाईलच्या जमान्यात त्या आजही त्यांच्याकडे असणाऱ्या जुन्या रेडिओवर गाणी ऐकतात. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास असंख्य जणांना प्रेरणा देणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *